सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन .......
लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली. वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी वेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले. महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत असे. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता. १९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.
कोलकात्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची, दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे जुलै २०, १९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.
गांधींजीनी देखिल कलकत्त्याला जाऊन दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्त्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.
१९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुं्बीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.
लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. १९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी, काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.
१९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधींजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, १९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.
जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.

No comments:
Post a Comment